एक कळकळीचे आवाहन
मुंबई मराठी साहित्य संघ ही संस्था गेली 84 वर्षे अविरतपणे मराठी साहित्य आणि मराठी रंगभूमी यांची सेवा करीत आहे. मराठी सांस्कृतिक जीवनाला प्रोत्साहन देत, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करीत ती मुंबईतील अग्रगण्य मराठी संस्था बनून राहिली आहे.महाराष्ट्राच्या बदलत्या सामाजिक वातावरणाची दखल घेत राहूनही या संस्थेने आपली ध्येयधोरणे जपून ठेवलेली आहेत.
संस्थेची साहित्यशाखा प्रतिवर्षी जुन्या-नव्या लेखकांचा पुरस्कार देऊन गौरव करते; महानगर तसेच महाविद्यालयीन साहित्य संमेलने आयोजित करते; “साहित्य” हे दर्जेदार त्रैमासिक प्रसिध्द करते; अमराठी भाषकांसाठी मराठी भाषेचे वर्ग चालवते; “अक्षर-साहित्य” उपक्रमाअंतर्गत अनेक छोटे प्रकाशन समारंभ, चर्चा, कविसंमेलने इत्यादी आयोजित करते; संदर्भ-मूल्य असलेली पुस्तके प्रसिध्द करते. इत्यादी.
नाट्यशाखेतर्फे अनेक स्पर्धा योजल्या जातात; नव्या-जुन्या नाटकांची निर्मिती होते;गुणवंत कलाकारांचा पुरस्कारांनी गौरव केला जातो; नाट्य-संगीत स्पर्धा आयोजित केल्या जातात तसेच अनेक स्पर्धांमध्ये साहित्य संघाची नाटके सादर केली जातात.
संस्थेच्या संदर्भ ग्रंथालयात अनेक दुर्मिळ पुस्तकांचा खजिना आहे. संस्थेचे एक मोठे सुसज्ज नाट्यगृह असून दोन छोटी सभागृहे आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ही संस्था नोंदणीकृत कार्यालय आहे.
20 मार्च, 2020 पासून मात्र संस्थेचे सर्व कार्यक्रम स्थगित आहेत.
उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेले नाट्यगृह बंद आहे. शासनाची मर्यादित मदत मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे निधीची तीव्र टंचाई जाणवते आहे. तरीही या काळात संस्थेच्या कार्यालयीन व रंगमंच कर्मचाऱ्यांना काही रक्कम अनुदान म्हणून देणे गरजेचे होते. त्यामुळेही संस्थेवर आर्थिक भार पडला. अशा परिस्थितीतही सर्व साहित्यिक व नाट्यविषयक कार्यक्रम स्थगित करणे शक्य नाही व योग्यही नाही. ग्रंथालयातील दुर्मिळ पुस्तकांचे डिजिटलायझेशन करायचे आहे. साहित्य व नाट्यशाखांचे कार्यक्रम खंडित होऊ नयेत म्हणून ऑनलाईन करायचे आहेत. संस्थेच्या कार्याचा प्रवाह वाहता ठेवायचा आहे.
या अडचणीच्या परिस्थितीत आपण संस्थेला शक्य तेवढी आर्थिक मदत करावी अशी कळकळीची विनंती आहे. अन्यथा इतकी प्रदीर्घ परंपरा असलेल्या संस्थेला आपले काम स्थगित करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.
उषा तांबे
(कार्याध्यक्ष)
धनादेश “मुंबई मराठी साहित्य संघ” या नावाने काढावा.
RTGS/NEFT करिता बँकेचे तपशील:
Bank Name: Saraswat co-op.bank ltd.
Branch : Girgaum
A/C No. 002200100046717
IFSC CODE: SRCB0000002