डॉ. राजाराम अमृत तथा बाळ भालेराव

जन्म:11 एप्रिल 1933  –  मृत्यू: 21 फेब्रुवारी 2020

मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक डॉ. अमृत नारायण भालेराव यांचे सुपूत्र. त्यांची शैक्षणिक कारकीर्द चढत्या भाजणीची होती. मॅट्रिक परीक्षा मेरीटसह उत्तीर्ण. नंतर मुंबई विद्यापीठाची एम.एस.जी.एस. मेडिकल कॉलेजमधून,‘एम. बी. बी,एस. परीक्षा अ‍ॅनाटॉमी आणि सर्जरी या विषयात सुवर्णपदके. ग्रेट ब्रिटन येथील कॉमनवेल्थ फेलोशिप. एफ. आर. सी.एस. एडिंबरो येथून.

वैद्यकीय कारकीर्द उदात्त पेशा म्हणून सांभाळताना त्यांनाही उच्च पदे आणि पदके स्वकर्तृवावर लाभली. या कारकीर्दीशी समांतर असे त्यांचे नाट्य आणि साहित्य विश्वाशी निगडीत कार्य आहे.

‘मुंबई मराठी साहित्य संघ’हे डॉ. अ. ना. भालेरावांचे बौध्दिक अपत्य. त्यांचे संगोपन आणि संवर्धन डॉ. बाळ भालेरावांनी आत्मीयतेने आणि निष्ठेने केले.

 

मुंबई मराठी साहित्य संघात ते नाट्यशाखा कार्यवाह, संघमंदीर कार्यवाह आणि नंतर प्रमुख कार्यवाह या पदांवर कार्यरत होते. साहित्य संघाच्या अनेक नाटकांचे निर्मिती प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यात नाटकांचे पुनरुज्जीवन होते, संगीत नाटकांची निर्मिती होती. ‘अजब  न्याय वर्तुळाचा‘ या रुपांतरित प्रायोगिक नाटकाचा जर्मनीला दौरा होता. प्रायोगिक रंगभूमीला साहित्य सँघात वाव देणे, नाट्यसंगीताचे आणि अभिनयाचे प्रशिक्षण वर्ग घेणे. कलारंगभूमीला उत्तेजन देणे, ‘ड्रमा स्कुल’या इंग्लिश/हिंदी रंगभूमिच्या प्रशिक्षणाला जागा देणे, नाट्यपुरस्कार प्रायोजित करणे, आदि अनेक कार्याचा समावेश आहे. अखिल भारतीय  नाट्य परिषदेला मुंबईत जागा मिळाली ती भालेरावांमुळे साहित्य संघातच. त्याचा परिपाक म्हणून 1999 मध्ये त्यांना अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद लाभले.

 

साहित्य संघाच्या नाट्यशाखेबरोबर साहित्य शाखेचीही भरभराट डॉ.बाळ भालेराव यांच्यामुळे झाली. साहित्य शाखेतर्फे होणारी ’शालेय विद्यार्थी शालेय संमेलन’, ‘महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन’, ‘महानगर मराठी साहित्य संमेलन’ आदि संमेलने त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत. साहित्य शाखेतर्फे पुस्तकनिर्मिती होते, ‘साहित्य’ नियतकालिक निघते, अनेक उपक्रम राबविले जातात, ‘अक्षर साहित्य’ दालन निर्मिती, पुरस्कारवितरण.. सहित्यिक कार्यक्रम इ. डॉ. बाळ भालेरावांच्या पुढाकाराने  आणि मार्गदर्शनाने साकारले. ‘अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळा’ची मूळ कचेरी साहित्य संघात असून साहित्य संघ महामंडळाची घटक संस्था आहे. त्यासंदर्भात मार्गदर्शन आणि निर्णयन डॉ. भालेरावांचे असे. अमराठी भाषकांना  मराठी शिकविण्याचा उपक्रम डॉ. बाळ भालेरावांच्या पाठिंब्यामुळे चालू आहे.

 

डॉ. बाळ भालेराव मुंबई मराठी साहित्य संघाचा आधार होता. दूरदृष्टी , कार्याचे आयोजन, वैचारीक आणि आर्थिक पाठबळ, समर्थ नेतृत्व. साहित्य आणि कलेची प्रगल्भ जाण, सहकाऱयांना सांभाळणे. अशा त-हेने ‘ मुंबई मराठी साहित्य संघाला’ प्रगतीशील ठेवत, त्यांनी समृध्द केले. ते संघाचे ‘आठवावा प्रताप’ असे जाणते राजे होते.

  • नॅशनल अकादमी ऑफ मेडिकल सायन्स चे ‘ फेलो’.
  • 20 वर्षे ( 1965 ते 1985 ) के.ई.एम् हॉस्पिटलमध्ये प्राध्यापक आणि ‘सर्जरी’ विभागप्रमुख.
  • 1985 पासून हिंदुजा हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर येथे सर्जरी विभागप्रमुख, गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजी आणि लिव्हर या विषयांचे तज्ञ.
  • 1989 ते 2001 – हिंदुजा हेल्थ केअर मध्ये रिसर्च विभागाचे सल्लागार, विश्वस्त.
  • जी.एस मेडिकल कॉलेजमध्ये ‘एमेरिट्स प्रोफेसर’.
  • या कार्यकाळात 60 हून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मेडिकल जर्नल्समधून लिखाण. सर्जरीसंदर्भात – 5 ऑडिओ कॅसेटची निर्मिती. जर्नल ऑफ पोस्ट ग्रॅजुएट मेडिसीनचे एडिटर.
  • मुंबई विद्यापीठ सिनेटचे कार्यकारीणी सदस्य (1974 ते 80) महाराष्ट्र वैद्यकीय विद्यापिठाचे सिनेट सदस्य.
  • डॉ. बी.सी. रॉय पुरस्कार (राष्ट्राध्यक्ष अब्दूल कलाम यांच्या हस्ते ).
  • डॉ. आर.के.मेंडा पुरस्कार (1983)
  • फाउंडर प्रेसिडेंट- ऑल इंडिया हॉस्पिटल फॉर इन्फेक्शन सोसायटी धन्वंतरी पुरस्कार.