मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगांव

मुंबई मराठी साहित्य संघ – मुंबईतील एक अग्रगण्य संस्था ! सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रांत कार्यकर्तृत्व गाजवून, नावलौकिक सार्थ करणारी ! या संस्थेने रौप्यमहोत्सव साजरा केला, सुवर्णमहोत्सवाच्या स्मृती कोरल्या, हीरकमहोत्सव व अमृतमहोत्सवाची तेजस्वी पाऊले उमटवून ‘साहित्य संघ’ आता शतकाकडे वाटचाल करीत आहे.

मुंबई शहर आणि उपनगर भागांत मराठी भाषा आणि साहित्य यांच्या सर्वांगीण अभिवृद्धीसाठी विविध प्रयत्न करण्याच्या हेतूने मुंबई मराठी साहित्य संघाचा जन्म 21 जुलै 1935 रोजी झाला. संस्थेचे पहिले कार्यालय संस्थापक डॉ अ.ना.भालेराव  यांच्या गिरगावातील नारायण – सदन या निवासस्थानी सुरु झाले. 1934 साली मुंबई येथे भरलेल्या मुंबई आणि उपनगर साहित्य संमेलनाच्या पहिल्या अधिवेशनचे स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. अ. बा. गजेंद्रगडकर यांची नियुक्ती झाली. या अधिवेशनापासून साहित्यिक स्वरूपाचे स्थायी कार्य करण्यासाठी अशी संस्था स्थापन करण्याची कल्पना निघाली. साधनांच्या मर्यादेप्रमाणे साहित्य संघाचे प्रारंभीचे कार्य मर्यादित राहिले. मुंबई व उपनगर भागांत वार्षिक साहित्य संमेलने भरविणे, साहित्यविषयक प्रासंगिक चर्चा घडवून आणणे, आल्या-गेल्या साहित्यिकांचा परामर्श घेणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱया परीक्षांचे वर्ग चालविणे, स्वतःची नियतकालिके चालविणे, कै. वामन मल्हार जोशी स्मरणार्थ दरसाल एखाद्या विद्वान वक्त्यांची पूर्वनियोजित व्याख्याने करवून ती शक्य तेव्हा पुस्तकरूपाने प्रसिद्ध करणे, व्याख्यानमाला चालविणे, असे या कार्याचे विविध प्रकारचे स्वरूप होते.

 

1938 साली स्वा. सावरकर व 1950 साली राजकवी यशवंत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महाराष्ट्र साहित्य संमेलने भरली ती संघाच्याच वतीने. तथापी, 1941 साली मुंबईस संघाच्या विद्यमाने भरलेले महाराष्ट्र नाटय़संमेलनाचे 32 वे अधिवेशन संघाच्या कार्यास जरा निराळी व जोराची कलाटणी देण्यास कारणीभूत ठरले. मराठी रंगभूमीस 1943 साली 100 वर्षे पूर्ण होतात हे लक्षांत घेऊन त्यावर्षी महोत्सव करण्याची कल्पना याच अधिवेशनात निघाली. त्यावर्षी मुख्य महोत्सव सांगली येथे नोव्हेंबर महिन्यात झाला, तरी एप्रिल 1944 मध्ये साहित्य संघाने मुंबई येथे नाट्योत्सव मोठ्या प्रमाणावर खुल्या नाट्यगृहात पुनः साजरा केला, इतकेच नव्हे तर त्यानंतर दरसाल कमीअधिक प्रमाणात मुंबईत नाट्योत्सव साजरा करण्याची प्रथा पडली. ही प्रथा आजपर्यंत संघाने अव्याहत पाळली आहे. खुल्या नाट्यगृहाची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली असली तरी अलीकडे मुंबईत व इतरत्र ती संघाने लोकप्रिय केली. 1944 साली पहिला नाट्योत्सव साजरा करत असतानाच ‘साहित्य संघाच्या व तत्सम इतर संस्थांच्या साहित्यविषयक चळवळींकरिता व मुंबईतील नाट्यसंस्थांना प्रतिष्ठित समाजासमोर अल्प भाडयात नाट्यप्रयोग करून दाखवण्याची सोय करणे’ असा उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला होता. तो तर साध्य केला गेलाच, परंतु लवकरच गिरगावातल्या केळेवाडीतील जमीन संपादन करून संघाने तेथे एक अद्ययावत नाट्यगृह बांधले. 6 एप्रिल 1964 रोजी या संघमंदिराचं उद्घाटन झाले आणि मराठी रंगभूमीला हक्काचं घर मिळाले.

प्रा. अ. बा. गजेंद्रगडकर, श्री. दाजीसाहेब तुळजापूरकर, श्री. श्री. म. वर्दे, श्री. रामराव विजयकर, श्री. भास्करराव जाधव, श्री. भा. सी. सुकथनकर, श्री. र. धो. कर्वे, श्री. खं. सा .दौंडकर असे मुंबईच्या विविध समाजातील थोर कार्यकर्ते संघाच्या बाल्यावस्थेत संघास लाभले आणि त्यांच्या विविध गुणांचा संघाला फायदा मिळाला म्हणूनच संघाबद्दल अल्पकाळात सार्वत्रिक आपुलकी निर्माण झाली, प्रतिष्ठा वाढली व साहित्य संघ मंदिराचे स्वप्न साकार झाले.