मुंबई मराठी साहित्य संघ

साहित्य शाखा

1934 साली भरलेल्या पहिल्या मुंबई व उपनगर साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. अ. बा. गजेंद्रगडकर यांची नियुक्ती झाली आणि तेव्हापासून गजेंद्रगडकरांचे मार्गदर्शन संघाला मिळाले. त्यांच्या खंबीर व निग्रही नेतृत्वामुळे संघ अनेक वादळांतून निभावून जाऊन आपल्या कार्याची छाप पाडू शकला.

श्री. दाजीसाहेब तुळजापूरकर तर संघ स्थापन झाल्यावर पहिले संघाध्यक्ष म्हणून निवडले गेले. व्यवहारी दृष्टीकोन, कार्याच्या त्रोटकपणाबद्दलचा कटाक्ष व साहित्यिक प्रतिष्ठा यायोगे संघाध्यक्ष या पदाचा मानदंड या पहिल्या अध्यक्षापासून निर्माण झाला.

श्री. भास्करराव जाधवांसारखा लोकमान्य आणि राजमान्य कार्यकर्ता संघास लाभल्यामुळे संघाच्या कार्यकर्त्यांची उंची निश्चितपणे वाढली. श्री. भ. सी. सुकथनकर यांच्यासारखा रसिक व कवी संघाच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी कोषाध्यक्ष म्हणून लाभला म्हणूनच त्याकाळी अनेक अडचणी निभावून गेल्या. श्री. र. धों. कर्वे यांच्यासारखा चिकित्सक व बुद्धिवादी कार्यकर्ता संघाच्या कार्याशी एकरूप झाला यावरून संघात बुद्धिवादाचा प्रभाव पहिल्यापासून होता हे दिसून येईल. श्री. खं. सा. दौंडकर यांच्यासारखा मराठा समाजात मान्यता पावलेला व साहित्यिक पिंडाचा कार्यकर्ता संघास मिळाला याचे संघास फार महत्व वाटते.

1938-41 या कालावधीत परिभाषामंडळ, नवे शुद्धलेखन प्रसार मंडळ, कॉपीराईट कायद्याचा विचार करून त्यांत सुधारणा सुचविण्यासाठी मंडळ, कोकणी भाषिकांची मराठी भाषा बोलणारे म्हणून नोंद व्हावी अशी चळवळ करण्यासाठी मंडळ, अशांसारखी अनेक पोटमंडळे नेमण्यात येउन संघाने व्यापक स्वरूपाचे कार्य करण्यास प्रारंभ केला. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या वाङमयीन परीक्षांसाठी वाङमयाचे अभ्यासवर्ग सुरु करण्यात आल्यावर या परीक्षांचे मुंबईतील केंद्र श्री. वा. रा. ढवळे यांच्या नेतृत्वाने संघाने सुरु केले. हे वर्ग आजतागायत सुरु असून, या वर्षापासून संघाने स्वतःच्या परीक्षा सुरु केल्या.

1950 साली महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे 33 वे अधिवेशन दि. 11 ते 15 मेपर्यंत राजकवी यशवंत दिनकर पेंढारकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरे झाले. या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी शाखासंमेलने भरविण्यात येऊन साहित्यातील निरनिराळ्या विभागांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली.