अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

स्वातंत्र्यपूर्व काळापासून महाराष्ट्रात अनेक मराठी साहित्य संस्था काम करीत आहेत. या संस्थांच्या ध्येय-धोरणांमध्ये सुसूत्रता आणावी, त्यांनी एकमेकांना सहकार्य करावे, यासाठी एक मध्यवर्ती साहित्य संस्था स्थापन करावी आणि त्या संस्थेने सर्व साहित्य संस्थांचे नेतृत्व करावे असा विचार सर्वप्रथम १९५१ साली कारवार येथे भरलेल्या संमेलनात मांडण्यात आला. तो प्रत्यक्षात येण्यासाठी १९६० साल उजाडावे लागले. अनेकांना त्या कल्पनेचा पाठपुरावा करावा लागला आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ या संस्थेची रीतसर स्थापना झाली.

 

मुंबई मराठी साहित्य संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, विदर्भ साहित्य संघ, नागपूर आणि मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद या महामंडळाच्या चार संस्थापक संस्था असून त्या कायम घटक संस्था मानण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सोडून इतर कोणत्याही राज्यातील, संपूर्ण प्रदेशाकरिता काम करणाऱया नोंदणीकृत साहित्य संस्था, तसेच बाहेरील देशांमध्ये त्या संपूर्ण देशाकरिता काम करणाऱया नोंदणीकृत साहित्य संस्था ह्यांना महामंडळात समाविष्ट करून घेता येते. सध्या महामंडळातील अशा संस्था मराठी साहित्य परिषद (हैदराबाद), मराठी साहित्य सेवा मंडळ(गोवा), कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद (गुलबर्गा), छत्तीसगढ मराठी साहित्य परिषद (बिलासपुर), याशिवाय संपूर्ण राज्याचे प्रतिनिधित्व न करणाऱया साहित्य संस्थेला संलग्न संस्था म्हणून मान्यता मिळते. मराठी वाङमय परिषद (बडोदे) ही अशी संलग्न संस्था आहे. महामंडळावर घटक संस्थेचे प्रत्येकी तीन प्रतिनिधी, समाविष्ट संस्थांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी आणि सर्व संलग्न संस्थांचे मिळून जास्तीत जास्त तीन प्रतिनिधी सभासद असतात. महामंडळाचे व्यवस्थापकीय कार्यालय प्रत्येक घटक संस्थेकडे तीन वर्षांच्या मुदतीसाठी असते. पुढील क्रमानुसार ते फिरते: १. मुंबई मराठी साहित्य संघ २. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ३. विदर्भ साहित्य संघ, नागपूर ४. मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद.

 

मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रांत कार्य करणाऱया संस्थांच्या धोरणांमध्ये आणि कामामध्ये एकसूत्रीपणा निर्माण करणे, मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी आणि संवर्धनासाठी कार्य करणे ही महामंडळाची उद्दिष्टे आहेत. त्यानुसार दरवर्षी (शक्यतो) मराठी भाषिक जनतेचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करणे, हे महामंडळाचे एक काम आहे. महामंडळाच्या वतीने मराठी साहित्य संमेलनाचे प्रथम अधिवेशन हैदराबाद येथे झाले. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून साहित्य संघाचे कार्यकर्ते, सुप्रसिध्द समीक्षक प्रा. वा. ल. कुळकर्णी ह्यांची निवड झाली होती. महामंडळाच्या कार्यात मुंबई मराठी साहित्य संघाचा सदैव सक्रिय सहभाग राहिलेला आहे.०२.१०.१९६१ रोजी महामंडळाची सभा मुंबईत साहित्य संघात झाली. १९८६ साली महामंडळाचे कार्यालय पुन्हा मुंबईकडे आले. जून १९९८ आणि 2010 मध्ये महामंडळाचे कार्यालय पुन्हा मुंबई मराठी साहित्य संघाकडे तीन वर्षासाठी आले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करणे हा महामंडळाचा एक हेतू आहे. सुरुवातीला आटोपशीर असलेली ही संमेलने अधिकाधिक व्यापक होत चालली आहेत. कराड, नगर, सोलापूर, नाशिक, सांगली, चंद्रपूर चिपळूण बडोदे, पिंपरी-चिंचवड, यवतमाळ , डोंबिवली, उस्मानाबाद, यवतमाळ येथील संमेलनांनी तर गर्दीचे उच्चांक गाठले. तीन-चार दिवस सतत चालणाऱया कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळतो. अशी संमेलने इतर भाषांमध्ये फारशी दिसत नाहीत असे मत अनेक ज्येष्ठ अन्यभाषिक साहित्यिकांनी वेळोवेळी व्यक्त केले आहे. संमेलनाला जोडून भरणाऱया ग्रंथ प्रदर्शनामध्ये पुस्तकांची विक्रीही प्रचंड प्रमाणात होते. एकूण हा मराठी भाषेचा उत्सव भव्य आणि उत्साही होत चालला आहे असे दिसते. २००९ साली महामंडळाने पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन सॅन होजे (अमेरिका) येथील बे एरिया महाराष्ट्र मंडळाच्या साहाय्याने आयोजित केले. दुसरे विश्व मराठी संमेलन २०१० ला दुबई येथे व तिसरे संमेलन २०११ मध्ये सिंगापूर येथे घेण्यात आले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ही संस्था नेतृत्व करते.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पुढीलप्रमाणे पदाधिकारी असतात:

  • एक अध्यक्ष, एक कार्यवाह, एक कोषाध्यक्ष.
  • उपाध्यक्षाची निवड समाविष्ट संस्थेमधून केली जाते