मुंबई मराठी साहित्य संघ

नाटय़ शाखा

साहित्य संघाच्या दि. 24 ऑक्टोबर 1943 या दिवशी भरलेल्या साधारण सभेने पुढील ठराव संमत केला. ‘मराठी रंगभूमीचा शतसांवत्सरिक उत्सव मुंबईत साहित्यसंघाने पुढाकार घेऊन घडवून आणावा व यासंबंधीची सर्व व्यवस्था कार्यकारी मंडळाने करावी’. या ठरावानुसार साहित्य संघाने मुंबईतील इतर संस्थांच्या सहकार्याने हा शतसांवत्सरिक महोत्सव दि. 15 एप्रिल 1944 पासून मोठ्या भव्य प्रमाणावर साजरा केला.

 

1943 च्या नोव्हेंबर मध्ये सांगली येथे मध्यवर्ती उत्सव मंडळातर्फे मराठी रंगभूमीचा शतसांवत्सरिक उत्सव साजरा करण्यात आला. त्यात साहित्य संघाने कै. देवल यांच्या शारदा नाटकाच्या निर्मितीची जवाबदारी स्वीकारून ती यशस्वीपणे पार पाडली. या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे कै. चिंतूबुवा गुरव यांनी दीर्घ कालावधीनंतर केलेली त्या नाटकातील श्रीमंताची भूमिका. तसेच, श्री. बालगंधर्व, श्री. गणपतराव बोडस, श्री. केशवराव दाते, कै. चिंतामणराव कोल्हटकर यांचे रंगभूमीवर एकत्र दर्शन.

 

1949 साली नाट्यविषयक कार्य सातत्याने करण्यासाठी संघाने नाट्यशाखेची स्थापना केली.

 

1951 साली नाटकांवरील करमणूक कर माफ व्हावा, नाट्यगृहे व नाट्यप्रयोग याबाबत इतर सरकारी निर्बंध दूर व्हावेत म्हणून संघाने त्यावेळचे मुंबई राज्याचे गृहमंत्री श्री. मोरारजी देसाई यांची भेट घेऊन आपले निवेदन त्यांस सादर केले व तासभर या विषयावर त्यांच्याशी सांगोपांग चर्चा केली.

 

1954 सालचा नाट्यशाखेचा महत्वाचा विक्रम म्हणजे या शाखेने दिल्ली येथे डिसेंबर महिन्यात झालेल्या राष्ट्रीय नाट्य महोत्सवात ‘भाऊबंदकी’ हे नाटक सादर केले व पारंपारिक विभागात या नाटकाला पहिल्या क्रमांकाचा मान मिळाला.

नाट्य शाखेचे सध्याचे विविध उपक्रम

 • मे 5 ते मे 9 – कै. दामू केंकरे स्मृती नाट्योत्सव – हा 5 दिवसाचा रंगोत्सव प्रायोगिक नाटकांचा महोत्सव.
 • 25 ऑगस्ट – साहित्य संघाचे आध्य संस्थापक कै.डॉ. अ.ना.भालेराव यांचा स्मृतीदिन. या दिवशी मराठी रंगभूमीवरील अनेक जेष्ठ कलावंत, गायक, वादक, लेखक, दिग्दर्शक, रंगमंच कामगार, रंगभूषाकार यांना“साहित्य संघ नाट्य सेवा गौरव पुरस्कार”देऊन सन्मानित करण्यात येते.
 • 28 ऑक्टोबर – ‘साहित्य संघ दिन’- साहित्य संघाची स्थापना जरी 21 जुलै 1935 या दिवशी झाली तरी प्रत्यक्ष संघकार्याची सुरुवात 28 ऑक्टोबर 1935 ला झाली म्हणून या दिवशी साहित्य विषयक व नाटकाचे विविध कार्यक्रम होतात. त्याच बरोबर पुढील नाटय़ सेवा गौरव पुरस्कारांचे वितरणही केले जाते.
 1. सहाय्यक अभिनेत्री – सुहासिनी मुळगावकर पारितोषिक( श्रीमती रजनी जोशी पुरस्कृत)
 2. संगीत नाटक गायक अभिनेत्री: (डॉ. विजया भालेराव आणि डॉ. श्रीरंग आडारकर पुरस्कृत)
 3. कै.प्र.पां.(आण्णा)जोशी स्मृती पुरस्कार : (आर्या दृर्गा क्रिएशन, कल्याण) (कै. प्रभाकरपंत जोशी ट्रस्ट पुरस्कृत )
 4. अण्णा फणसे स्मृती पारितोषिक : (राधाकृष्ण कलामंच रत्नागिरी)(राज्यनाटय़ स्पर्धेत प्रथम संगीत नाटक (संस्था), श्रीमती नलिनी फणसे पुरस्कृत)
 5. संगीत नाटक गायक अभिनेता : (श्री. य. वि. भातखंडे आणि श्री. मोरेश्वर हरी लिमये उर्फ नाना लिमये पुरस्कृत)
 6. प्रायोगिक रंगभूमी संस्था पुरस्कार : (कै. बापूराव पेंढारकर स्मृती समिती पुरस्कृत)
 7. वादक कलाकार (व्हायोलिन) :(श्री. लक्ष्मण त्रिलोकेकर पुरस्कृत)
 8. डॉ. मधुकर आष्टीकर स्मृतीप्रित्यर्थ (विनोदी नाटय़ लेखन) : (श्रीमती शामा खोत पुरस्कृत)
 9. सर्वोत्कृष्ट नाटय़ कलावंत : (श्रीमती शामला केळकर आणि श्री. सुरेश शांताराम प्रभूझांटय़े पुरस्कृत)
 10. सर्वोत्कृष्ट स्त्री कलावंत : (कै. रजनी मेहता स्मृतिप्रित्यर्थ, श्रीम. विद्या फडके आणि लिला मेहता पुरस्कृत)
 • 12 डिसेंबर – साहित्य संघाचे आध्य संस्थापक कै. डॉ. अ. ना. भालेराव यांचा हा जन्म दिवस. त्यांच्याच नावाने“अमृत कुंभ”एकांकिका स्पर्धा घेतली जाते. याच दिवशी राज्यस्तरीय नाट्यगीत गायन स्पर्धेची अंतिम फेरी घेतली जाते. 2020 साली कोविड प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा ऑनलाईन घेतली गेली व त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. परिक्षक म्हणून संपदा माने आणि ओंकार इनामदार
 • २६ डिसेंबर –”कै. दाजी भाटवडेकर स्मृती दिन”या दिवशी नाट्य प्रवेश, नाट्य संगीत असे कार्यक्रम सदर केले जातात. हा कार्यक्रम“दाजी भाटवडेकर स्मृती सेवायन”व साहित्य संघ या दोन संस्था मिळून करतात.
 • दाजी कट्टा : मुंबई मराठी साहित्य संघाने आता 85 व्या वर्षात पदार्पण केले आहे. या  वास्तुमध्ये अनेक मान्यवरांच्या आठवणी दडलेल्या आहेत.असेच एक कार्यकर्ते म्हणजे डॉ.दाजी भाटवडेकर. दाजींच्या कारकीर्दीत संघाची विशेष आठवण म्हणजे संघाच्या आवारातील कठडा. या कठड्यावर दाजींसह अनेक मान्यवर येऊन गप्पांचा कट्टा रंगवत. या आठवणीच्या निमित्ताने दाजी कट्टा ही संकल्पना अस्तित्वात आली. जिथे अनेकांनी येऊन आपल्या प्रगतीविषयी माहितीपुर्वक मार्गदर्शन जुन्या व नावीन पिढीला करावे. जुन्या आठवणींना उजाळा देऊन हा कट्टा जागवावा. या कट्टय़ाचे उदघाटन संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते झाले. दाजी कट्टा या उपक्रमाअंतर्गत विविध विषयांवरील कार्यक्रमांचे अयोजन साहित्य संघाच्या तळमजल्यावर  केले जाते. ( उदा. मुलाखती, एकपात्री अभिनय, संगीतविषयक, इ.)
 • अमृताचे बोल : या कार्यक्रमांतर्गत तिस-या मजल्यावरील अ.ना.भा सभागृह डॉ.बाळ भालेराव यांनी सुरु केले. त्याचा योग्य वापर व्हावा आणि मराठीतील उत्तम साहित्य, विस्मृतीत गेलेली काही नाटके ही पुन्हा अभिवाचनाच्या स्वरुपात का होईना लोकांपुढे यावीत यासाठी अमृताचे बोल हा कार्यक्रमाची कल्पना प्रमोद पवार यांनी मांडली. या कल्पनेला डॉ.भालेराव यांनी  आनंदाने संमती दिली. यात अनेक मान्यवरांनी हजेरी लावलेली आहे. पतंगाची दोरी , माता द्रौपदी अशा बाळ भालेरावांनी आवर्जून सांगितलेल्या नाटकांचे अभिवाचन येथे झालेले आहे.
 • अमृत नाट्य भारती तर्फे 59व्या महाराष्ट्र राज्यनाट्यस्पर्धांमध्ये साहित्य संघाचा( नाट्यशाखा) महत्वाचा सहभाग असून 2019 -2020 या वर्षी मराठी, हिंदी ,संस्कृत, बालनाट्य स्पर्धा अशा विविध विभागातून नाटकांचे सादरीकरन केले. त्यासाठी खालील नाटके आपल्या संस्थेतर्फे सादर करणार होतो. यापैकी 4 नाटकांचे प्रयोग झाले.
 1. हौशी मराठी नाटक : गेम (लेखक, दिग्दर्शक : श्री. मनोहर सोमण)

मुंबई केंद्रातून प्राथमिक फेरीत अमृत नाटय़ भारती आयोजित गेमया नाटकाला घवघवीत यश मिळाले असून या नाटकाची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे.

 

 1. बालनाटय़ : अगुलेक्झाल (संकल्पना : श्री. प्रमोद पवार, लेखक : माधुरी भरत चव्हाण

दिग्दर्शक : प्राची सहस्त्रबुद्धे, सहदिग्दर्शक – विजय वारूळे)

राज्यनाटय़ स्पर्धेतील अगुलेग्झाल या नाटकात बालनाटय़ शिबीरातील मुलांची निवड केली गेली. दि. 10 जानेवारी 2020 रोजी साहित्य संघ मंदिर येथे या नाटकाचे उत्तम सादरीकरण झाले.

 1. संस्कृत नाटक : पण्डितः अपण्डितः(लेखक डॉ. प्रसाद भिडे ,दिग्दर्शक : अभिप्राय पारकर)पण्डितः अपण्डितः या नाटकाचे सादरीकरण शिवाजी मंदिर येथे झाले.
 2. संगीत नाटक : संगीत स्वयंवर (लेखक : कृ. प्र. खाडिलकर,दिग्दर्शक : श्री. प्रमोद पवार)

संगीत नाटय़स्पर्धेतील संगीत स्वयंवर या नाटकाचा स्पर्धेतील प्रयोग इचलकरंजी येथे सादर झाला. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित, पं. भास्करबुवा बखले यांचे संगीत असलेल्या अजरामर नाटकाच्या दिग्दर्शन, नेपथ्याची जबाबदारी श्री. प्रमोद पवार, संगीत मार्गदर्शक श्री.मकरंद कुंडले यांचे होते. या नाटकाच्या सादरीकरणासाठी द्वितीय पारितोषिक मिळाले. सर्वोत्कृष्ट गायनासाठी संपदा माने हीस रौप्य पदक, ओंकार प्रभुघाटे यास गायनासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे तसेच प्राची सहस्त्रबुद्धे आणि सुनील जोशी यांस अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे मिळाली.

 

 1. हिंदी नाटक : तुगलक (लेखक : गिरिश कर्नाड, दिग्दर्शक : अभिनव ग्रोव्हर)

राज्यनाटय़ स्पर्धेतील‘तुगलक’ या हिंदी नाटकाचा प्रयोग दि. 24 मार्च 2020 रोजी होणार होता; परंतु कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ह्या नाटकाची तारीख पुढे ढकलण्यात येणार असल्याचे कळविले गेले. ‘थिएटर फॉर थिएटर’ या संस्थेच्यावतीने चंदीगड़ येथे 30 दिवसांचा नाटय़महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवात भारतातील काही नाटकांचा समावेश असणार होता. यावेळी मुंबई मराठी साहित्य संघ (नाटय़शाखा) बेताल या संस्थेच्या सहयोगाने दि. 14 फेब्रुवारी 2020 रोजी ‘तुगलक’ या हिंदी नाटकाचे सादरीकरण झाले.त्यास उत्तम प्रतिसाद लाभला.